Dr. B. R. Ambedkar Hostel Help JaiBhim | Login or Register |
Home > Post > Article > Dharmanirpeksha - Panthnirpeksha : Debate and Reliaty - Article Back

Dharmanirpeksha - Panthnirpeksha : Debate and Reliaty - Article

Ambedkarite People | Political | Fri, 8 Jul 2016

धर्मनिरपेक्ष – पंथनिरपेक्ष : वाद आणि वास्तव

अनिल कारुजी काणेकर, लाखांदूर

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, मुंबई 400025 कडून इयत्ता सहावीसाठी इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेकरीता अनुक्रमे My English Book Six, बालभारती इयत्ता सहावी व सुलभभारती छठी कक्षा या पाठ्यपुस्तकांची प्रथमावृत्ती 2016 मध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

वरील तिन्ही भाषेतील पाठ्यपुस्तकांत अनुक्रमे Constitution of India, भारताचे सविधान व भारत का संविधान ची Preamble – उद्देशिका छापलेली आहे. इंग्रजी भाषेतील उद्देशिकेत पहिल्या परिच्छेदात SECULAR व शेवटच्या परिच्छेदात.... this twenty sixth day of November, 1949, मराठी भाषेतील उद्देशिकेत वरील इंग्रजी शब्दांबद्दल अनुक्रमे धर्मनिरपेक्ष व ....आज दि.26 नोव्हेंबर, 1949 रोजी, हिंदी भाषेतील वरील इंग्रजी शब्दांबद्दल अनुक्रमे पंथनिरपेक्ष व.... आज तारीख 26 नवम्बर 1949 . (मिति मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छह विक्रमी) असे छापलेले आहे.

हिंदी भाषेतील उद्देशिकेत पंथनिरपेक्ष व.... आज तारीख 26 नवम्बर 1949 . या मजकुरासोबत (मिति मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छह विक्रमी) असे छापलेले पाहून शिक्षक संघटनांनी व इतरांनी त्याबद्दल विरोध करणे सुरु केल्याचे वृत्तपत्रातून वाचायला मिळाले. (संदर्भ : नागपूर येथून प्रकाशित होणारे दैनिक लोकमत, दिनांक 04 मे 2016, पृ.क्र.2 व लोकमत दि.06 मे 2016 हॅलो भंडारा पृ.क्र.2)

विरोधकांचे म्हणणे आहे की, पाठ्पुस्तक निर्मिती मंडळाने धर्मनिरपेक्ष शब्दाऐवजी पंथनिरपेक्ष व 26 नवम्बर 1949 . या मजकुरासोबत मिति मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छह विक्रमी असा मजकूर घुसडला आहे. त्यांना धर्मनिरपेक्ष व 26 नवम्बर 1949 . एवढेच शब्द छापलेले हवेत, म्हणजे वाद संपेल.

पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, मुंबईने वर्ग 6 वी साठी हिंदी सुलभभारती ची प्रथमावृत्ती 2007 ला प्रकाशित केली. या पुस्तकातील उद्देशिकेत पंथनिरपेक्ष व 26 नवम्बर 1949 . (मिति मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छह विक्रमी) असेच छापलेले असून तेव्हापासून 2016 पर्यंत इयत्ता 5 वी ते 8 वी पर्यंतच्या मुद्रित – पुनर्मुद्रित व प्रकाशित हिंदी पाठ्यपुस्तकातील उद्देशिकेत वरील प्रमाणेच मजकूर छापलेला असतांना शिक्षक संघटनांनी वा इतर संघटनांनी यापुर्वी वाद उत्पन्न केल्याचे खात्रीलायकरित्या मंडळाकडून समजते.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे कडून इयत्ता 9 10 वी साठी 2007 ते 2013 पर्यंत मुद्रित – पुनर्मुंद्रित करुन प्रकाशित केलेल्या हिंदी लोक भारती (द्वितीय भाषा) या पाठ्यपुस्तकातील उद्देशिकेत धर्मनिरपेक्ष व इयत्ता 10 वी साठीच हिंदी लोकभारती प्रथमावृत्ती 2013 व पुनर्मुद्रण 2014 या पाठ्यपुस्तकांत मात्र पंथनिरपेक्ष शब्द छापलेला असून सर्वच पाठ्यपुस्तकातील उद्देशिकेत 26 नवम्बर 1949 . (मिति मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छह विक्रमी) असेच छापलेले आहे. याविषयी चौकशी केली असता मंडळातील गोवर्धन सोनवाने साहेब यांचेकडून कळले की, धर्मनिरपेक्ष शब्द छापल्याबद्दल मागे वाद उत्पन्न झाला होता. मंडळाला झालेली चूक लक्षात आली तेव्हा मंडळाने धर्मनिरपेक्ष शब्दाऐवजी पंथनिरपेक्ष शब्द स्विकारल्याचे शुद्धिपत्र काढले व पूढील आवृत्तीत पंथनिरपेक्ष शब्द छापून वाद कायमचा मिटविला गेला. सध्या पंथनिरपेक्ष या शब्दाबद्दल वाद निर्माण करणाऱ्या शिक्षक संघटनांनी व इतरांनीही वरील सत्यता समजून घेतली असती तर वाद निर्माण केला नसता, असो.

धर्मनिरपेक्ष – पंथनिरपेक्ष शब्दाबद्दलची व तारखेसोबत असलेल्या मजकुराची संविधानिक सत्यता पडताळण्यासाठी संविधान निर्मिती कशी झाली व मूळ उद्देशिकेत कोणते शब्द होते हे समजून घेणे गरजेचे आहे.

द्वितीय जागतिक महायुद्धाच्या समाप्तीनंतर कॅबिनेट मिशन योजनेप्रमाणे भारताचा भावी राज्यकारभार चालविण्याकरीता संविधान निर्मितीसाठी एका संविधान सभेची गरज होती. तेव्हा प्रांतीय विधानमंडळाच्या निर्वाचित सदस्यांद्वारे संविधान सभेवर सदस्यांची निवडणूक जुलै-ऑगष्ट 1946 पर्यंत करण्यात आली. संविधान सभेने 9 डिसेंबर 1946 रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीच्या कार्याचे उद्घाटन केले. या सभेत 296 सदस्यांना सहभागी होण्याचा अधिकार होता. परंतू त्यापैकी 207 सदस्य हजर होते. अनुपस्थितांत प्रामुख्याने मुस्लिम लीगच्या सदस्यांचा समावेश होता.

संविधान सभेने 11 डिसेंबर 1946 रोजी डॉ.राजेंद्रप्रसाद यांची संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणून आणि 29 ऑगष्ट 1947 ला डॉ.बी.आर.आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड केली. मसुदा समिती अध्यक्षांनी 315 अनुच्छेद व 8 परिशिष्टांचा संविधान मसुदा 21 फेब्रुवारी 1948 ला संविधान सभाध्यक्षांना सादर केला. संविधान मसुदा सुमारे 8 महिनेपर्यंत लोकांना चर्चेसाठी उपलब्ध होता आणि त्यानंतर हा सुदा 4 नोव्हेंबर 1948 रोजी संविधान सभेपुढे चर्चेसाठी सादर करण्यात आला. या मसुद्यावर संक्षिप्त चर्चा करण्यात आली, यालाच मसुद्याचे प्रथम वाचन म्हणतात.

15 नोव्हेंबर 1948 ला प्रत्येक अनुच्छेदावर क्रमवार सविस्तर चर्चा सुरु झाली व 17 ऑक्टोबर 1949 ला समाप्त झाली, याला संविधान मसुद्याचे दुसरे वाचन संबोधन्यात आले. 17 ऑक्टोबर 1949 ला संविधानाच्या उद्देशिकेवर सविस्तर चर्चा होऊन बहुमताने उद्देशिका स्विकारण्यात आली.

14 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेचे सत्र सुरु होऊन मसुद्याच्या तिसऱ्या वाचनास सुरुवात झाली व 26 नोव्हेंबर 1949 रोजी सत्र संपले. 395 अनुच्छेद व 8 परिशिष्टे असलेले संविधान स्विकृत झाल्याचे घोषीत करण्यात आले व त्यावर संविधान सभाध्यक्षांनी स्वाक्षरी केली.

संविधान सभेचे कार्य 2 वर्षे 11 महिने 17 दिवस चालले. या कालावधीत संविधान सभेची 11 सत्रे व 165 बैठकी झाल्यात. 22 नोव्हेंबर 1949 पर्यंत संविधानावर 63,96,729/- रु. खर्च झालेत.

संविधान सभा सदस्यांनी संविधानावर हस्ताक्षर करण्यासाठी म्हणून 24 जानेवारी 1950 रोजी संविधानाच्या तीन प्रती सभापटलावर ठेवण्यात आल्यात. त्यात इंग्रजी भाषेतील एक प्रत हस्तलिखीत व एक प्रत छापील होती. तसेच हिंदी भाषेतील हस्तलिखीत एक प्रत होती. संविधान सभाध्यक्षांच्या विनंतीवरुन उपस्थित सदस्यांनी तिन्ही प्रतींवर सह्या केल्यावर जनगणमन आणि वंदे मातरम यांचे गायन होऊन संविधान निर्माण सभेचे कार्य पुर्ण झाले.

26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाच्या अनुच्छेद 394 अन्वये अनुच्छेद 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 392 393 असे एकूण 15 अनुच्छेद तात्काळ अंमलात येऊन संविधान अंशत: लागू झाले.

संविधानाच्या अनुच्छेद 393 अन्वये संविधानाचे नाव इंग्रजीत Constitution of India, हिंदीत भारत का संविधान आणि मराठीत भारताचे संविधान असे आहे.

भारताचे संविधान अनुच्छेद 368 मध्ये दिलेल्या कार्यपद्धतीनुसार संसदेला संविधानात दुरुस्ती (Amendment) करता येते. संविधान बदलविता येत नाही किंवा संविधानाचे पुनर्विलोकन (Review) करता येत नाही. संविधानात दुरुस्ती करतांना आधी इंग्रजी भाषेतील संविधानात नंतर संविधान अनुच्छेद 394 (1)()()(2)(3) प्रमाणे हिंदी भाषेतील संविधानात दुरुस्ती केल्या जाते.

अनुच्छेद 368 प्रमाणे मार्च 2015 पर्यंत संसदेने संविधानात 100 दुरुस्त्या केल्या आहेत. संविधान (पहिली सुधारणा) अधिनियम 1951 नुसार 9 वी अनुसूची व संविधान (चौऱ्याहत्तरवी सुधारणा) अधिनियम 1992 नुसार 12 वी अनुसूची संविधानात जोडली आहे. तेव्हापासून आजपर्यंत संविधानात एकूण 12 अनुसूच्या आहेत.

संविधान लागू झाल्यापासून 26 नोव्हेंबर 1949/26 जानेवारी 1950 ते 1976 पर्यंत संविधानाच्या इंग्रजी प्रतितील Preamble मध्ये SOVEREIGN DEMOCRATIC REPUBLIC, ...... the unity of the Nation ..... twenty sixth day of November, 1949 व हिंदी भाषेतील उद्देशिकेत वरील शब्दांबद्दल अनुक्रमे सम्पूर्ण प्रभुत्व सम्पन्न लोकतंत्रात्मक गणराज्य, .... राष्ट्र की एकता...., .... आज जारीख 26 नवम्बर 1949 .मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छह विक्रमी .... असा मजकूर दाखल होता.

दिवंगत प्रधानमंत्री इंदीरा गांधी यांच्या कार्यकाळात 1976 मध्ये संविधान 42 वी दुरुस्ती झाली. त्यावेळी इंग्रजी भाषेतील Preamble मध्ये संविधान (बेचाळीसावी सुधारणा) अधिनियम 1976 नुसार SOVEREIGN DEMOCRATIC REPUBLIC या मजकूराऐवजी SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC आणि ...... the unity of the Nation.... या मजकूराऐवजी ...... the unity and integrity of the Nation असा मजकूर घालण्यात आला. त्याचवेळी हिंदी भाषेतील उद्देशिकेत वरील मजकूराबद्दल सम्पूर्ण प्रभुत्व सम्पन्न लोकतंत्रात्मक गणराज्य या मजकूराऐवजी अनुक्रमे सम्पूर्ण प्रभुत्व सम्पन्न समाजवादी पंथनिरपेक्ष लोकतंत्रात्मक गणराज्य असा मजकूर व राष्ट्र की एकता या शब्दाऐवजी राष्ट्र की एकता और अखंडता असा मजकूर घालण्यात आला, तेव्हापासून आजपर्यंत हाच मजकूर उद्देशिकेत आहे.

महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाद्वारे प्रकाशित भारताचे संविधान पहिली आवृत्ती 1979 व इंग्रजी मराठी द्विभाषी Constitution of India भारताचे संविधान सातवी आवृत्ती 2014 मधील मराठी भाषेतील उद्देशिकेमध्ये इंग्रजी SECULAR शब्दाबद्दल धर्मनिरपेक्ष व .... this twenty sixth day of November, 1949 .... मजकूराबद्दल आज दि.26 नोव्हेंबर 1949 रोजी असा मजकूर छापलेला आहे.

पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने वर्ग 6 वी साठी My English Book Six, बालभारती इयत्ता 6 वी, सुलभभारती छठी कक्षा या 2016 ला प्रकाशित केलेल्या Preamble, उद्देशिका व त्यातील मजकूर/शब्द हा भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील अधिकृत संविधानाच्या Preamble, उद्देशिकेप्रमाणेच छापलेला आहे. पाठ्यपुस्तकांत छापलेल्या उद्देशिकेत कोणतीही चुक केली नाही किंवा कोणतेही शब्द घुसडलेले नाहीत.

विरोधकांनी लक्षात घ्यावे की, भारत का संविधान या अधिकृत संविधानाच्या उद्देशिकेत आज तारीख 26 नवम्बर 1949 . (मिति मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छ विक्रमी) हा मजकूर 24 जानेवारी 1950 पासून व पंथनिरपेक्ष हा शब्द 1976 पासून छापलेला आहे. त्यांनी आपल्या समाधानासाठी इंग्रजी, हिंदी व मराठी भाषेतील अधिकृत संविधानाच्या प्रतितील उद्देशिका बघावी.


संदर्भ :

  1. Constitution of India Reprinted, Govt. of India, 2010
  2. भारत का संविधान की मूल सुलिखीत प्रतिलीपी (हिंदी संस्करण) लोकसभा सचिवालय -1999
  3. Constitution of India भारत का संविधान द्विभाषी आवृत्ती, भारत सरकार 1991
  4. Constitution of India भारताचे संविधान द्विभाषी आवृत्ती, महाराष्ट्र राज्य, सातवी आवृत्ती, 2014
  5. संविधान सभा के वाद विवाद खंड XI एवं XII लोकसभा सचिवालय, 1994
  6. भारताचे संविधान, एकोणतिसावी आवृत्ती, 26 जानेवारी 2016, संपादक प्रदिप गायकवाड, समता प्रकाशन, नागपूर


अनिल कारुजी काणेकर, सेवानिवृत्त,..शि., सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालय, लाखांदूर तथा अध्यक्ष, बहुजन प्रबोधन मंच, “नागवंश” लाखांदूर, जि.भंडारा-441803 मो.8275397815/9420865580


We invite and encourage all our members to contribute by writing their own articles either in English (recommend) or in Hindi or in Marathi language/s and send us at support@navayan.com
Share this with your friends!

X

Navayan

x